नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेत लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. २१ :- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ३८४ गावातील निवडण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी वैयक्तीक लाभांचे घटकासाठी अर्ज करणे सुरु आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत निवडण्यात आलेल्या ३८५ गावातील शेतकऱ्यांनी नोंदणी करुन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

या योजनेत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, फळबाग लागवड,  रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, शेडनेट, पॉली हाऊस, बांधावर वृक्ष लागवड इत्यादी बाबींसाठी अर्ज करता येतात.  त्यासाठी ६० ते ८० टक्क्यांपर्यंत विविध घटकांसाठी अनुदान देय आहे. याशिवाय समुदाय आधारीत घटकात प्रकल्पासाठी निवड झालेल्या गावातील कोणत्याही यंत्रणेकडे नोंदणी झालेले शेतकरी / शेतकरी बचत गट / भूमिहिन व्यक्तीचे इच्छुक गट/ महिला / महिला बचत गट  व जिल्हयातील शेतकरी उत्पादक गट कंपन्या व शेतकरी उत्पादक संघ याचा लाभ घेऊ शकतात. त्यामध्ये प्रामुख्याने शेतमालावर आधारीत प्रक्रिया उद्योग, गोदा, कृषि औजारे बँक या बाबींचा लाभ घेता येईल. कारखाना यंत्रे आणि प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक बांधकाम खर्चाच्या ६० टक्के अनुदान देय आहे.

इच्छुक शेतकरी / शेतकरी बचत गट / भूमिहिन व्यक्तीचे इच्छुक गट/ महिला / महिला बचत गट  व जिल्हयातील शेतकरी उत्पादक गट कंपन्या व शेतकरी उत्पादक संघ यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *