मुद्रांक शुल्काच्या दंडाबाबत सवलत योजना

नांदेड प्रतिनिधी, दि. २४ :- नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजना ही १ एप्रिल २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पहिला टप्पा हा ३१ जुलै २०२२ रोजी संपत आहे. थकीत मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकीत शास्ती यासंबंधी पक्षकारांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या असतील व त्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल तर त्यासंबंधित पक्षकारांनी या योजनेच्या माहितीसाठी जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

संबंधित पक्षकारांनी ३१ जुलै २०२२ रोजी पर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास या सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजे थकित शास्तीवरील ९० टक्के सवलतीचा लाभ मिळेल अन्यथा सदर पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्ती प्रमाणे थकित शास्तीवर ५० टक्के दंड भरावा लागेल.

योजनेचे संक्षिप्त स्वरूप

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ३१, ३२ (अ), ३३, ३३ (अ), ४६, ५३ (१अ) व ५३ (अ) अन्वये मुद्रांक शुल्क शास्तीच्या संदर्भात दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या पक्षकारांसाठी ही माफी योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ही योजना १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ८ महिने कार्यान्वित राहणार आहे. सदर माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक १ एप्रिल ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापुर्वीच भरले असल्यास दंडाच्या रक्कमेत ९० टक्के सूट मिळेल. दिनांक १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापूर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास दंडाच्या रक्कमेत ५० टक्के सूट मिळेल.

या योजनेबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे कॉल सेंटर ८८८८००७७७७ व ई-मेल आयडी complaint@igrmaharashtra.in यावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेडचे सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *