अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड  दि. ५ :-  अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. सन २०२२-२३ या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज   www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर ३० सप्टेंबर २०२२ पर्यत भरावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यामिक)  नांदेड यांनी केले आहे.

मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना २३ जुलै २००८ च्या शासन निर्णयानुसार सन २००८-०९ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही शिष्यवृत्ती योजना मुस्लीम, ख्रिश्चन,शीख, पारसी,बौद्ध व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व शासकीय/ निमशासकीय/ अनुदानित/ विनाअनुदानित / स्वयं अर्थसहाय्यीत सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

अल्पसंख्याक समाजातील गुणवंत मुलींसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना ३ मे २००३ पासून सुरु केलेली आहे. ही योजना अल्पसंख्याक समाजातील इयत्ता ९ वी ते बारावी पर्यंतच्या मुलींसाठी आहे. इयत्ता ९ वी व  दहावीच्या मुलींना वार्षिक रुपये ५ हजार व ११ वी व १२ वी च्या मुलींना वार्षिक ६ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा प्रत्येक वर्षी नवीन अर्ज भरावा लागेल. याबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास शेख रुस्तुम, शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद नांदेड मो.न. ९६८९३५७२१२, ८२०८१८४६७३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अर्ज भरण्याची प्रक्रिया २० जुलै २०२२ पासून सुरु झालेली आहे. प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजचे  नवीन विद्यार्थी (फ्रेश स्टुडंट)  व  नुतनीकरण  विद्यार्थी (रीनिवल स्टुडंट) यांचे ऑनलाईन  अर्ज भरावयाची अंतिम मुदत  ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत  आहे. सन २०२१-२२ यावर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे  अर्ज  रीनिवल स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. रीनिवल विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध आहे. तसेच नवीन, इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांचे  अर्ज फ्रेश स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यामिक)  यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *