पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृह

महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. तसेच आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी या चार प्रमुख यात्रेला लाखो भाविक पंढरीत येतात. आषाढी व कार्तिकी वारीमध्ये तर अवघी पंढरपूर नगरी नामघोषाने दुमदूमून जाते. भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या अनेक सोयी-सुविधांबरोबरच येणाऱ्या भाविकांना भजन कीर्तन आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम घेता यावेत यासाठी राज्य शासन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून नामसंकीर्तन सभागृहाचे काम सुरू आहे.

 

            वारकरी संप्रदायाबरोबरच कला रसिकांसाठी हे पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृह पर्वणी ठरणार आहे. त्याची ही थोडक्यात माहिती.

 

तमाम मराठी मनाचे श्रद्धास्थान, आदरस्थान, माहेरघर आणि भक्तिस्थान म्हणून पंढरपूरची ओळख आहे. प्रतिवर्षी लाखों भाविक मोठ्या भक्तीभावाने विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी पंढरीची वारी करतात. अधिकाधिक सोयी देऊन भाविकांना विठू माऊलीचे दर्शन सुकर व्हावे यासाठी शासन व स्थानिक प्रशासन प्रयत्नशील असते. आपले शासन भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी अहोरात्र कार्यरत आहे.भाविकांच्या सोयीसाठी असाच एक प्रकल्प नामसंकीर्तन सभागृहाच्या माध्यमातून पंढरपूर येथे साकारत आहे.

 

वैभवात भर

संत तनपुरे महाराज मठाच्या पश्चिमेस संत गाडगे महाराज मठाच्या मागे आदर्श प्राथमिक विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नगरपालिकेच्या जागेमध्ये हे ६०  कोटी रुपयांचे भव्य असे नामसंकीर्तन सभागृह बांधण्यात येत आहे. अशा प्रकारचे राज्यातील हे एकमेव बहुउद्देशीय आणि वातानुकूलित असे सभागृह आहे. नामसंकीर्तन सभागृह पंढरपुराच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे. हे सभागृह भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात येत आहे. राज्य शासनाकडून नामसंकीर्तन सभागृह बांधकामाला सन २०१७ ला १० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. सन २०१९ ला १०कोटी रूपये त्यानंतर मार्च २०२२ ला १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.

 

 

सोयी-सुविधा

या नामसंकीर्तन सभागृहास एकूण तीन मजले असून बांधकाम करण्यात येत असलेल्या प्लॉटचे क्षेत्रफळ १ लाख ११ हजार ५८० चौरस फूट इतके आहे. सुमारे १ लाख ६४३ चौरस फूट बांधकाम करण्यात येत आहे. तळमजल्यावर बहुउद्देशीय हॉल व डायनिंग हॉल बांधण्यात आलेला आहे. प्रत्येक मजल्यावर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छताग्रहाची व्यवस्था, अपंगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्पची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, भव्य रंगमंच व्यवस्था सर्व अत्याधुनिक सुविधांसह वातानुकूलित केले आहे. ध्वनी व्यवस्था, प्रकाश योजना, कलाकारांसाठी भव्य मंच, कलाकारांसाठी मेकअप रूम, व्हीआयपी पाहुण्यांसाठी व अपंगांसाठी दोन स्वतंत्र लिफ्टची व्यवस्था असणार आहे. नामसंकीर्तन सभागृहास दगडी संरक्षक भिंत, दगडी प्रवेशद्वार अंतर्गत विद्युतीकरण, अग्निरोधक यंत्रणा, परिसरात आकर्षक कारंजे, अंतर्गत सिमेंट रस्ते अशी विविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच सभागृहाच्या दर्शनी भागामध्ये संतांच्या मूर्ती आणि पालखी मार्गावरील महत्त्वाचे टप्पे याबाबतची चित्र रेखाटण्यात येणार आहे. सभागृहाच्या दर्शनी भागात श्री विठ्ठलाची आकर्षक मूर्ती बसविण्यात येणार आहे.

 

पालखी सोहळा

पंढरीचे महात्म्य दर्शविणाऱ्या यात्रा कालावधीतील विविध संतांच्या पालखी सोहळ्यासह, रिंगण सोहळा, दिंडी, संतचरित्र, साहित्य हे प्रसिद्ध चित्रकारामार्फत रेखाटण्याचे नियोजन आहे. या प्रेक्षणीय सभागृहाचे श्रद्धेचा भाव निर्माण होईल अशी वातावरण निर्मिती आहे. वास्तुरचना करताना चंद्रभागा नदीवरील घाट, पायऱ्या काळ्या पाषाणाच्या करण्याचे नियोजन आहे.

 

१२०० क्षमतेचे सभागृह

नामसंकीर्तन सभागृह अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त बनविण्यात येणार असून यामध्ये सुमारे १२००जणांची बैठक क्षमता असणार आहे. तसेच विठुरायाचे भक्त असणाऱ्या सर्व साधू संतांचे माहात्म्य याठिकाणी दर्शविण्यात येणार आहे. या नामसंकीर्तन सभागृहामुळे पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे. भक्तीसंगीतासोबतच इतर कार्यक्रमांचे आयोजन याठिकाणी करण्याची सोय होणार आहे. हे सभागृह पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरच्या वैभवात निश्चितच भर पडून भाविकांना उत्तम सोयी-सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल असा विश्वास आहे.

 

000000

अविनाश गरगडे,

उपमाहिती कार्यालय, पंढरपूर.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *