लातूर जिल्ह्यातील नगर परिषदा, नगर पंचायती कचरा मुक्तीकडे… वेंगुर्ला पॅटर्न प्रमाणे हजारो टन कचरा विघटन सुरु

▪️ मराठवाडा मुक्ती दिनी सर्व नगर परिषद आणि नगर पंचायती होणार       कचरा मुक्त

▪️ प्लास्टिक वेगळं केल्यामुळे लवकर होणार कंपोस्ट तयार

लातूरप्रतिनिधी, दि. २९ लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, उदगीर, अहमदपूर नगर परिषदा, शिरूर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर, जळकोट या नगर पंचायतीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या सूचनेनुसार कचरा विघटन सुरु झाले असून नगर परिषद प्रशासनाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन विघटन प्रक्रिया कशी करावी याच्या प्रात्यक्षिकासह सांगितल्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा एक आदर्श नमुना म्हणून लातूर जिल्ह्याची राज्यात ओळख होईल, असा विश्वास रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे.

 

कचरा वेगळा होतोय

प्रशासनाच्या कचरा मुक्तीच्या चळवळीला आता लोकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असून घरातला सुका, ओला, प्लास्टिक आणि इतर कचरा वेगळा देण्याची सवय लागत आहे. कर्मचारी स्वतः कचरा घेताना लोकांना कोणता कचरा कसा कुठे टाकायचा हे सांगत असल्यामुळे कचऱ्याची गाडी कोरड्या कचऱ्यामुळे कोणत्याही दुर्गंधी शिवाय जात आहे. ओला कचरा वेगळा केल्यामुळे आणि त्यात इतर कोणतेही घटक मिक्स नसल्यामुळे त्यावर कल्चरचा परिणाम होऊन कंपोस्ट होण्याची प्रक्रिया जलद होणार आहे.

आता कोणत्याही नगर परिषद आणि नगर पंचायत शहरात कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत. जिथे कचऱ्याचे ढीग होते तिथे गार्डन केले जाणार असल्याची माहिती कोकरे यांनी दिली.

औसा नगर पालिकेची कचरा मुक्तीसाठी रॅली

औसा नगरपालिकेकडून आज घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी सप्ताह अंतर्गत सर्व दहा पथका मार्फत संपूर्ण शहरात १०० टक्के कचरा वेगवेगळा करून झाल्यानंतर बसस्टॅन्ड ते कचरा डेपो पर्यंत भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यात सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला.

 

वेंगुर्ला पॅटर्न प्रमाणे होणार लातूर जिल्हा

२०१५ साली वेंगुर्ला नगर परिषदेला मुख्याधिकारी असताना रामदास कोकरे यांनी घन कचरा व्यवस्थापनाचा पॅटर्न राबवला. त्याला देशभर नावाजले गेले, अनेकांनी त्यावर रिसर्च पेपर केले. कोट्यावधी रुपयाचे बक्षीसे नगर परिषदेला मिळाले. त्याच धरतीवर लातूर जिल्ह्यात काम व्हावे असा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचा आग्रह आहे. त्यानुसार सर्व नियोजन करून लातूर जिल्ह्यात काम सुरु करण्यात आले आहे. त्याला व्यापक प्रतिसाद मिळतो आहे. यात नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *