परभणी प्रतिनिधी, दि.०७ : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्या येत आहे. यानिमत्ताने येथील जिल्हा परिषदेच्या नविन इमारत येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग रचनाची कामे करुन छतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी संकलीत करुन पाणी साठा निर्माण करण्यासाठीची कार्यशाळा ४ सप्टेंबर रोजी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षेत पार पडली.
या कार्यशाळेस यशदा, पुणे येथील संसाधन व्यक्ती डॉ. अशोक सांवत आणि अॅड. विजय जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस जिल्हा परिषदेतील उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) ओमप्रकाश यादव, वरिष्ठ भु-वैज्ञानिक प्रशांत पोळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी यशवंत मस्के, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जी. एस. यंबडवार यांचेसह सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व शाखा अभियंता यांच्यासह जिपतील विविध विभागातील कर्मचारीवृंद उपस्थित होते.
यावेळी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे म्हणाले की, रेन वॉटर हार्वेस्टिंग रचना करणेबाबत संबंधित अधिकारी यांनी याबाबत जिल्हाभरामध्ये २० सप्टेंबर पर्यंत कामे पुर्ण करावीत. तसेच या कालावधीत पडणाऱ्या पावसाचे पाणी संकलीत करण्यात यावीत. तसेच गावातील सर्व नागरीकांना त्यांच्या घरावर देखील रेन वॉटर हार्वेस्टिंग रचना करणेबाबत जनजागृती करण्यात यावी.