शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन तीस संघ सहभागी

 

हिंगोली, दि. २० : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित तालुका खो-खो असोसिएशनच्या पुढाकाराने रामलिला मैदानावर शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेत जिल्ह्यातील तीस संघ सहभागी झाले आहेत.

येथील रामलीला मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद हिंगोली व तालुका खो-खो असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेला काल सोमवार दि. १९ डिसेंबर रोजी सुरुवात झाली. दोन दिवशीय शालेय खो-खो स्पर्धेत जिल्ह्यातील विविध गटातील ३० संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

 

 

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, हिंगोली तालुका खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण देशमुख, क्रीडा अधिकारी बस्सी, असोसिएशन सचिव प्रा.नरेंद रायलवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी जिल्हाभरातील खेळाडूना मार्गदर्शन करताना जिल्ह्यात स्पर्धा वाढल्या पाहिजेत, खेळाडू पुढे आले पाहिजेत.

 

 

 

 

खेळाडूंना सुविधा देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे सांगून तालुका खो-खो असोसिएशनच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचे त्यांनी कौतूक करीत उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले. उपस्थितांचे आभार कल्याण देशमुख यांनी व्यक्त केले.

 

 

 

 

या स्पर्धा तीन मैदानावर तीन गटात खेळविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी क्रीडा शिक्षक, शिक्षिका, पंच, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *