औरंगाबाद,दि. १६:- :- ई-पीक पाहणी, स्मार्ट सिटी प्रकल्प, स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, पाणी पुरवठा प्रकल्प योजना, अशा सर्व उपकमांची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी झालेली आहे. यासह अनेक नवनवीन योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्याने उत्तरोत्तर विकास साध्य करावा अशा शुभेच्छा स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणाप्रसंगी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वातंत्रसैनिक, खासदार इम्तियाज जलील, आ. संजय सिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, सह.आयुक्त् (जीएसटी) जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी, इतर सर्व मान्यवर, अधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलीस पदक जाहीर झालेले मधुकर सातपुते, समादेशक राज्य राखीव पोलीस बलगट- औरंगाबाद, सहायक पोलीस उप निरीक्षक बाळू भिमराव कानडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी, राष्ट्रपती शौर्य पोलीस पदक गोवर्धन धनाजी कोळेकर, सेवानिववृत्त् पोलीस अधिकारी यांना दंगलीच्या वेळी केलेली महत्वपूर्ण कामगिरी, पोलीस उपनिरीक्षक आर्थीक गुन्हे शाखा, यांना गुणवत्ता विशेष सेवा मधील विठ्ठल गजानन घोडके यांना अतिनक्षल भागात जनजागरण व आदिवासी विकासाबाबत, तसेच विशाल दिनकर बोडखे यांना छत्तीसगड मधील नक्षलवादी माहिलेला आत्मसमर्पण योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले असल्याने त्यांच्यासह आदींचा समावेश आहे.
पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले की, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता जिल्ह्यामध्ये सर्व यंत्रणा तत्पर ठेवण्यात आलेल्या आहेत. घाटीमध्ये कोविड रुग्णसेवेकरीता ८५० ऑक्सिजन बेड, १५० आयसीयू बेड तर ११० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सध्या २ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. तालुकास्तरावर ३३ कोविड केअर सेंटर तर ग्रामीण भागात गंभीर रुग्णांसाठी २५ डीसीएचसी सुरू करण्यात आलेल्या आहेत.
मनपाने तयार केलेले ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ हे ॲप तर देशभरात अनुकरणीय ठरले आहे. पोस्ट कोविड होम आयसोलेशन मधील रुग्णांच्या पाठपुराव्यासाठी कॉल सेंटर कार्यरत आहे. मनपाचे बालरोग कोविडसाठी एमजीएम स्पोर्टस, गरवारे स्टेडियम, मेल्ट्रॉन डिसीएचसी येथे उपलब्ध असून मातृत्व कोविड सेंटरही सज्ज असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले.
पालकमंत्री यांच्या भाषणातील इतर ठळक मुद्दे
मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये ३४८ ऑक्सिजन बेड कार्यन्वित आहेत. पीएसए प्लांट ट्रायल बेसिसवर सुरू आहे. आतापर्यात सुमारे ७५०० रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत.
जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण मोहिम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ९ लाख १२ हजार नागरिकांनी पहिला तर ३ लाख २६ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यामध्ये लस प्रभावी शस्त्र असून नागरिकांनी लस घेण्यास प्राधान्य द्यावे.
औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम उत्तमरित्या सुरू आहे. मिटमिटा येथील नियोजित सफारी पार्कच्या उभारणीसाठी १४७ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मृतीवन व स्मारक उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. या कामावर आतापर्यंत १ कोटी ३० लाख इतका निधी खर्च झालेला आहे. संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरूस्तीसाठी देखील मनपा प्रयत्नशिल आहे.
औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्प योजना प्रस्तावास मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. १३ सप्टेंबर २०१९ अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री आवास योनजाअंतर्गत रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास अशा सर्व घरकुल योजनांमध्ये मिळून सुमारे ५ हजार ५८६ घरकुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहे.
शिवभोजन ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये २७ शिवभोजन केंद्र सुरू आहेत. आतापर्यंत १४ लाख ०८ हजार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.