युवा सरपंच संतोष पाटील यांचे सर्वत्र कौतुक
देगलूर प्रतिनिधी, दि.०५ -: देगलूर तालुक्यातील येरगी येथे काल दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त चालुक्य कालीन सरस्वती मंदिर,शिवमंदिर,हनुमान मंदिर व बारव व परिसरात गावातील सर्व महिलांनी व पुरुषांनी अगदी हर्ष उल्हासात सहभागी होत हजारों दिवे लावून दिवाळीनिमित्त दीपोत्सव साजर केला.
हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण परिसर उजळून निघाले होते.
गावचे युवा सरपंच संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून ग्राम पंचायत कडून दीपावली निमित्त सर्व गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी,गावच्या विकासासाठी हा दीपोत्सव मागील वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे.यावेळी सर्वांनी गावाच्या सुखसमृद्धी साठी देवाची प्रार्थना केली.
देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन येरगी गावच्या इतिहासात मागील वर्षापासून सामूहिक दीपावली साजरी करत आहेत.यात गावातील सर्व महिला- पुरुष,दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या नवविवाहित महिला उत्साहात सहभागी होतात.
विशेषतः महिलांनी मातीचे दिवे आणि गव्हाच्या पिठापासून दिवे बनवून आणले होते. प्रत्येक महिलांनी किमान १०१ दिवे आणले होते. अशा हजारो दिव्यांनी गावातील मारुती मंदिर,चालुक्य कालीन शिवमंदिर, बारव परिसर लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाले होते. या विलोभनीय दृश्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला
लाभले असे गावातील ज्येष्ठांनी सांगितले .आणि ग्राम पंचायत कडून आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. या दीपोत्सवात गावातील सर्व कुटुंबातील सदस्य सामील झाले होते.
या दीपोत्सवात सरपंच संतोष पाटील,सर्व ग्रामपंचायत
सदस्य,महिला बचत गट, सर्व ज्येष्ठ नागरिक,आजी माजी सरपंच, पदाधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, दक्षता समिती, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, सर्व गावकरी,बालिका पंचायत राज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी,आदींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.