नांदेड (प्रतिनिधी)दि.०२:- पोलीस स्टेशन लोहा येथे दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. ८०/२०१३ मध्ये मा. प्रथम श्रेणी न्यायालय, कंधार यांनी नुकताच निकाल देत मुख्य आरोपीस १ वर्षे साधी कैद व ५,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
दिनांक ४ नोव्हेंबर २०१३ रोजी सायं. ६ वाजता नांदेड जिल्ह्यातील पानभोसी (ता. कंधार) येथे फिर्यादी राज नारायण सूबुककरू (वय २५) हे त्यांच्या घरा समोर उभे असताना, आरोपी बळीराम पिराजी दुबुकवाड हा त्यांच्या घरासमोर लघवी करत होता. फिर्यादीने त्याला विरोध करताच आरोपी व त्याचे इतर आठ साथीदारांनी फिर्यादी व त्याच्या भावास शिवीगाळ करत काठीने मारहाण केली व गंभीर दुखापत केली.
या प्रकरणी पोलिसांनी कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ३२४, ३२३, ५०४ भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. तपास अधिकारी पोउपनि श्री. पेथे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून ठोस पुरावे गोळा करत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती कल्याणी कुलकर्णी यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. खटल्यादरम्यान पोहेकॉ. उत्तम घुगे (ब.नं.११४६) यांनी कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून भूमिका बजावली. प्रभारी अधिकारी श्री. नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण खटला पार पडला.
न्यायाधीश मा. श्री के.एस. खंदारे यांनी सादर पुराव्यांच्या आधारे आरोपी बळीराम पिराजी दुबुकवाड (वय ३२, रा. पानभोसी) यास कलम ३२६ भादंवि अंतर्गत १ वर्षे साधी कैद व ५,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांनी तपास अधिकारी, पेरवी अधिकारी व संपूर्ण टीमचे अभिनंदन करत, अशा गंभीर गुन्ह्यांत दोषारोपपत्र वेळेत दाखल करण्याचे निर्देश सर्व ठाण्यांना दिले आहेत.
न्याय मिळाल्यास उशीर झाला असला, तरीही अन्यायाच्या विरोधात पोलिसांच्या प्रयत्नांनी न्यायालयात यश मिळाल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.