नागपूर प्रतिनिधी,दि.०३:- समतेचा वारसा जपणारे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवणारे डॉ. आंबेडकर कॉलेज, नागपूरचा ‘डॉ. आंबेडकर कॉलेज,
नागपूरचा हीरक महोत्सव सोहळा’ भारताचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले की, ज्या कॉलेजच्या उभारणीत पद्मश्री दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई, सदानंद फुलझेले यांचा मोठा वाटा होता, त्याच कॉलेजमध्ये आज दादासाहेब गवई यांचे सुपुत्र मा.श्री
भूषण गवई सरन्यायाधीश म्हणून उपस्थित राहणे, हा विलक्षण योग आहे. केवळ ३०० विद्यार्थी आणि ५ वर्गखोल्यांपासून सुरू झालेल्या या महाविद्यालयात आज ६००० हून अधिक विद्यार्थी, ५० पेक्षा अधिक वर्गखोल्या आणि विविध पारंपरिक व अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरु आहेत.
या महाविद्यालयाने नॅकचा ‘A’ दर्जा, यूजीसी कडून ‘कॉलेज विथ पोटेंशियल फॉर एक्सलन्स’ सारखे सन्मान मिळवत हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
संविधानिक मूल्यांची जोपासना करत या महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात आपले उच्च स्थान निर्माण केले आहे. अनेक विद्यार्थी हे त्यांच्या कुटुंबातील शिक्षण घेणारे पहिले सदस्य आहेत, ही या संस्थेच्या सामाजिक योगदानाची साक्ष आहे.
या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आज सत्कारित ५ विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थिनी आहेत, ही बाब विशेष आनंददायक आहे. महिलांचा मुख्य धारेत सहभाग हा महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन होता जो आज प्रत्यक्षात उतरलेला दिसतो.
महाविद्यालयाचे योगदान समाजपरिवर्तनाच्या दिशेने असेच कायम राहो आणि महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होत शिक्षण, समता व प्रगतीचा वसा पुढे नेत राहो, ही अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी मंत्री संजय शिरसाट, भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, डॉ. आंबेडकर कॉलेज, नागपूरच्या प्राचार्या डॉ. दीपा पन्हेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.