नागपूर प्रतिनिधी,दि.०३:- महिला विश्वचषक २०२५ च्या FIDE स्पर्धेची विजेती ठरलेल्या भारताची पहिली महिला ग्रॅण्डमास्टर दिव्या देशमुख हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे भव्य नागरी सन्मान सोहळा आयोजित करून गौरव करण्यात आला.
ही ऐतिहासिक कामगिरी करून संपूर्ण देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या दिव्या देशमुखचा सन्मान करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “दिव्या देशमुखचं हे यश केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद
आहे. तिच्या जिद्द, मेहनत आणि बुद्धिमत्तेचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. ती आजच्या तरुण पिढीसाठी खरा आदर्श ठरली आहे.”
या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. परिणय फुके, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्या देशमुखने या सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “ही स्पर्धा जिंकणे हे माझं स्वप्न होतं आणि ते सत्यात उतरल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. महाराष्ट्र आणि भारताने मला जे प्रेम व पाठिंबा दिला त्यासाठी मी सदैव ऋणी राहीन.”
नागपूरसारख्या शहरातून उगम पावलेली ही बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उंचावते आहे, ही बाब संपूर्ण नागपूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. तिच्या या यशामुळे शहरात आणि राज्यात आनंदाचं वातावरण आहे.