जयंत शर्मा/ झारखंड प्रतिनिधी,दि.०४:- झारखंडचे माजी मुख्यमंत्री, झारखंड मुक्ति मोर्चा (JMM) पक्षाचे संस्थापक आणि आदिवासी हक्कांचे बुलंद आवाज असलेले शिबू सोरेन यांचे रविवारी (४ ऑगस्ट २०२५) सकाळी ८:५६
वाजता दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. दीर्घ काळ आजारी असलेल्या सोरेन यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते.
शिबू सोरेन यांना आदराने “दिशोम गुरू” (लोकनेते) म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या आयुष्यभर आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष केला. झारखंड राज्याच्या निर्मितीत त्यांनी निर्णायक भूमिका बजावली होती.
ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री राहिले. तसेच केंद्र सरकारमध्ये कोळसा मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली JMM पक्षाने झारखंडमध्ये आदिवासी अस्मितेला नवे बळ दिले.
त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना झारखंडचे मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र हेमंत सोरेन म्हणाले, “आज मी शून्य झालो आहे. माझ्यासाठी हे वैयक्तिक नुकसान नाही, तर एका युगाचा अंत आहे.”
शिबू सोरेन यांच्या निधनाने केवळ झारखंडच नव्हे, तर संपूर्ण देशाने एक प्रबळ जननेता गमावला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अंत्यसंस्कार सोमवारी झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात त्यांच्या मूळगावी पार पडणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
शिबू सोरेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या कार्याची आठवण कायम जनतेच्या मनात राहील.