मुंबई, दि. १७ : बालकामगार, अनाथ, आपदग्रस्त आणि वंचित मुलांसाठी कार्यरत ‘दि चिल्ड्रन्स एड सोसायटी’ मुंबईला गृह विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
मुंबईतील दि चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या कार्यकारी समितीची बैठक गृहमंत्री श्री.वळसे पाटील आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महिला व बाल विकास आयुक्त राहुल मोरे, कार्यकारी समिती सदस्य मिलिंद तुळसकर, महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय क्षीरसागर उपस्थित होते.
बाल न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत बालगृहाच्या नूतनीकरणाच्या प्रारूप आराखड्यास बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच प्रारूप आराखडा अंतिम मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. संस्थेच्या जागावरील अतिक्रमाणाबाबत उच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांवर कामकाज करण्यासाठी संस्थेच्या वतीने विशेष वकील नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेचा मागील वर्षाचा जमाखर्च अहवाल सादर करण्याचे निर्देशही श्री.वळसे-पाटील यांनी यावेळी दिले.
सोसायटीच्या मौजे बोर्ला येथील जागेवरील अतिक्रमण हटविणे. तसेच मौजे मानखुर्द येथील जागेचा भाडेकरार वाढविणे या विषयावर चर्चा झाली. तसेच कर्मचाऱ्यांना सेवालाभ आणि सेवा नियमांमध्ये सुधारणा आदी विषयावर निर्णय घेण्यासाठी संबंधित विभागाबरोबर विशेष बैठक आयोजित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.