देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी प्रशासन सज्ज.

देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी प्रशासन सज्ज. तिन लाख मतदार बजावणार ३४६ मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क.

देगलूर :दि. २८ : विधानसभा पोट निवडणूकीसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झालं असून त्यादृष्टीने  प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.देगलूर विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी ३४६ मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आलेली आहे. मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ९७६ अधिकारी-कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतदानासाठी प्रशासनामार्फत विविध साहित्याची जुळवाजुळव सुरु असून ईव्हीएम मशीन आदींसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेल आहे. निवडणूक निर्णय अधिकार्याकडून  मतदान केंद्रसाठी आढावा घेतला जात आहे. ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे तालुकास्तरीय कार्यालय ठेवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने तेथे कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि साहित्य वितरित करण्यासाठी मंडप बांधण्याचे काम जोरदार सुरु आहे. याचबरोबरीने मतमोजणी करण्यासाठीही या ठिकाणी विशेष सुरक्षेसह कक्षाची तयारी केली जाणार आहे. प्रत्येक अधिकारी वर्गाला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली जबाबदारी या अनुषंगाने मतदानाची पूर्वतयारी सुरू करण्यात आलेली आहे.
पोट निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर  राजकीय पक्षांच्या प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला असला तरी या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासह निवडणूक आचारसंहिता प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीमार्फत विविध नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचारीवर्ग मार्फत छायाचित्रीकरण करणे, देखरेख ठेवणे,फिरती पथके अशी कामे करण्यात येत आहेत.
देगलूर विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ९८ हजार ८५३ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ४४ हजार २५६ स्त्रिया तर १ लाख ५४ हजार ९२ पुरुष आणि ५ मतदार तृतिय पंथी यांचा समावेश आहे.  एकूण ३४६ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे त्यासाठी एकूण १ हजार ९७६ कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे तर ३४६ पोलीस कर्मचारी आणि ६२ बसेसची जीप २९ झोनल अधिकारी ,१२ भरारी पथक,एस एस टी २२पथक याची नेमणूक करण्यात आली आहे ८ संवेदनशील मतदान केंद्र केंद्र असून १५ प्रधानशील मतदान केंद्र आहेत   त्याचबरोबरीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. प्रत्येक केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराला हाताचे निर्जंतुकीकरण त्याचबरोबरीने तोंडाला मूखपट्टी लावणे असे जनजागृतीपर संदेशही प्रशासनामार्फत देण्यात आलेले आहेत. त्या दृष्टीने नागरिकांनीही मतदानाची नैतिक जबाबदारी पार पाडताना करोना संबंधातील उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनामार्फत सांगितले गेले आहे. सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. ही प्रक्रिया संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. ईव्हीएम मतदान यंत्रांची बिघाड होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.
मतदान करणारे एकूण मतदार : २९८८५३
महिला मतदार : १४४२५६
पुरुष मतदार : १५४०९२
मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी वर्गासह पोलीस वर्गही तैनात राहणार आहे. प्रत्येक केंद्रांवर किमान एक ते दोन पोलीस शिपाई यासह पोलीस अधिकाऱ्यांची फिरती पथकं आणि त्याच्यावर त्या भागातील उपविभागीय अधिकारी लक्ष ठेवून राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *