महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

मुंबई, दि. १० (रानिआ) : विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १ नोव्हेंबर २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या पोटनिवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १७ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर २३ नोव्हेंबर २०२१ रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी: धुळे- ५ब,  अहमदनगर- ९क, नांदेड-वाघाळा- १३अ, मीरा-भाईंदर- १०ड आणि २२अ, सांगली-मिरज-कुपवाड- १६अ आणि  पनवेल- १५ड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *