मेळघाटातील टेंभुर्णी ढाणा सौर ऊर्जेच्या प्रकाशाने उजळले – ‘महाऊर्जा’कडून दिवाळीची प्रकाशभेट

अमरावती, दि. १० :  शतकापासून अंधारात असलेल्या मेळघाटातील टेंभुर्णी ढाणा या गावात ‘मेडा’कडून सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, सौर ऊर्जा प्रकल्पाचा लाभ मिळालेले हे मेळघाटातील तिसरे गाव आहे.

यापूर्वी धारणी तालुक्यातील चोपण आणि चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेड्या येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून तिथे घरोघर वीज पोहोचविण्यात आली. विविध कारणांमुळे ‘महावितरण’ची वीज पोहोचणे शक्य नसल्यामुळे मेळघाटातील दुर्गम खेड्यांपर्यंत वीज पोहोचणे हे मोठे आव्हान होते. या समस्येवर उपाययोजनेसाठी ‘महाऊर्जा’ने (मेडा) सौर ऊर्जा निर्मितीसारख्या अपारंपरिक ऊर्जेचा पर्याय दिला. त्यानुसार चोपण व रेट्याखेड्यापाठोपाठ माखलानजिक टेंभुर्णी ढाणा या गावालाही सौर ऊर्जाधारित सूक्ष्म पारेषण प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे.

घरोघर वीजपुरवठ्यासह रस्तेही उजळले

टेंभुर्णी ढाणा येथील सौर ऊर्जाधारित सूक्ष्म पारेषण प्रकल्प ३७.८ किलोवॅटचा आहे. त्यासाठी ६९ लाख ९ हजार रुपयांचा निधी खर्च झाला. या प्रकल्पामुळे तेथील कुटुंबाना चोवीस तास वीज मिळू लागली आहे. गावांत २० पथदिवेही कार्यान्वित झाल्याने रस्तेही उजळले आहेत.

‘महाऊर्जा’कडून दुर्गम गावांत प्राधान्याने सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर व आमदार राजकुमार पटेल यांनी या गावासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत निर्देश दिले होते. त्याला अनुसरून ‘महाऊर्जा’चे महासंचालक सुभाष डुंबरे, अतिरिक्त महासंचालक सूरज वाघमारे व प्रादेशिक संचालक वैभव पाथोडे यांच्या मार्गदर्शनानुसार आराखडा तयार करण्यात आला, असे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी सांगितले.

 

जिल्हाधिकारी पवनीत कौर व धारणी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी  वैभव वाघमारे यांनीही आढावा घेऊन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार ‘महाऊर्जा’तर्फे दिवाळीपूर्वी प्रकल्प पूर्ण करून कार्यान्वित झाला असून तेथील रहिवाशांमध्ये दिवाळीची प्रकाशभेट मिळाल्याची भावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *