शस्त्रक्रियेनंतर बऱ्या होणाऱ्या रुग्णांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री वडेट्टीवार

चंद्रपूर दि. १० : कुष्ठरोगावर  लवकर निदान व योग्य उपाययोजना करून हा रोग बरा करणे शक्य आहे. कुष्ठरोगावर बहुविध औषधोपचारामुळे कुष्ठरुग्णांची संख्या कमी होत आहे. ज्याप्रमाणे देवी रोगासारखा कुष्ठरोग हा इतिहासजमा होईल तो दिवस दूर नाही. त्यासाठी समाजातील नागरिकांनी स्वतः पुढे येऊन आरोग्याची तपासणी करावी, कुष्ठरोग असल्यास त्वरित औषधोपचार केल्यास हे साध्य करता येईल. असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केले.

आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कुष्ठरोग विकृती पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाप्रसंगी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, एम.एस.ऑर्थो सल्लागार आर.एल.टी आर.आय रायपूरचे डॉ.कृष्णमृर्ती कांबळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, प्रकाश देवतळे प्रामुख्याने उपस्थित होते.

स्व. बाबा आमटे यांनी आनंदवन येथे कुष्ठरोग्यांची अविरत सेवा केली, कुष्ठरोग्यांना तिमिरातून तेजाकडे नेण्याचे कार्य त्यांनी केले. असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या माध्यमातून कुष्ठरोगामुळे डोळे, हात, पाय शरीराच्या या भागावर  असलेल्या विकृतीवर मोफत शस्त्रक्रिया एम.एस.ऑर्थो सल्लागार आर.एल.टी आर.आय रायपूरचे डॉ.कृष्णमृर्ती कांबळे व त्यांची टिम करणार आहे. त्यांचे व त्यांच्या टीमचे हे कार्य अतुलनीय आहे. असेही ते म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, कुष्ठरोगाच्या विकृतीतून, शस्त्रक्रियेनंतर बऱ्या होणाऱ्या रुग्णांना स्वयंरोजगार  उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या हाताला रोजगार देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ देणार असल्याचेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित कुष्ठरोग विकृती पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांची विकृती दूर करून त्यांचे जीवन सुखकर करण्यास मदत होईल. शस्त्रक्रियेनंतर विकृतीतून बरे झालेल्या रुग्णांना त्यांच्या पुनर्वसनासाठी व स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *