अन् ‘मराठी श्रीवल्ली’कार, विजयच्या गालावर आनंदाची कळी खुलली
अमरावती प्रतिनिधी दि.२३ :- “तुझी झलक वेगळी श्री वल्ली, काळजात तू भरली” अशा मराठी ‘श्रीवल्ली’कार विजय खंडारे या तरुणाला महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून नुकतीच प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेऱ्याची अनपेक्षित भेट मिळाली. या अनोख्या भेटवस्तूमुळे आपल्याला आनंद झाला असून, ताईंनी दिलेल्या शाब्बासकीने यापुढे अधिक चांगलं काम करून दाखविण्याचं बळ मिळाल्याची प्रतिक्रिया विजयने व्यक्त केली आहे.
तब्बल १५ दशलक्षहून अधिकवेळा युट्यूबवर पाहिले गेलेले “तुझी झलक वेगळी श्री वल्ली, काळजात तू भरली” हे गाणं अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील विजय खंडारे या तरुणाने बनविले आहे. बीएससीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेला विजय अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला. लहानपणी भाजी विक्रीपासून हमालीपर्यंतची कामे त्याने केली आहेत. मात्र टिक टॉक अॅपपासून आपल्या सोशल प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आणि अस्सल वऱ्हाडी बोली भाषेतील मनोरंजक व्हिडिओ व ब्लॉगद्वारे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. टिक टॉक बंद झाल्यानंतर विजय युट्यूबकडे वळला व अल्पावधीतच त्याला लोकप्रियता मिळत गेली. सुपरहिट ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या मराठी आवृत्तीने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहाेचविले. याची दखल घेत ॲड. ठाकूर यांनी विजय खंडारेसह त्यांचे कुटुंबिय आणि टीमचा गौरव केला. यावेळी अनपेक्षित भेटवस्तू देण्याचे त्याला सांगितले होते. त्यानुसार अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना ॲड. ठाकूर यांनी विजयकडे प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेरा दिला.
तर असे होतकरू विजय निर्माण होतील
आपल्या आसपास अनेक युवा अतिशय मेहनत घेऊन अभिनव पद्धतीने काम करीत आहेत. त्यांच्यातील गुणवत्ता ओळखू त्यांना प्रोत्साहान दिले तर ते अधिक चांगल्यारीतीने व गतीने काम करतील. विजयसारखे अनेक युवा निर्माण होतील, पर्यायाने आपले, आपल्या गावाचे, समाजाचे नाव रोशन करतील. याच भावनेतून विजयला त्याच्या कामात मदत करणारी वस्तू देण्याची माझी इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली याचा मला आनंद आहे. विजय, तर माझ्या जिल्ह्यातला होतकरू, हुशार आणि कष्टाळू तरुण युट्यूबर आहे. त्यामुळे त्याचे कौतुक करणे हे क्रमप्राप्त ठरते. बीएससीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेतरी अतिशय बिकट परिस्थितीशी दोन हात करीत विजय इथपर्यंत पोहाेचला आहे. त्याने निवडलेला मार्ग चांगला आहे. तो अतिशय दर्जेदार कंटेट निर्माण करीत आहे, मात्र तो वापरत असलेली साधनसामुग्री पुरेशी नाही. आतापर्यंत अनेक अडचणींचा सामना करूनही त्याने उत्तम चित्रफिती तयार केल्या आहेत. त्याच्या घरी भेट देऊन संवाद साधल्यानंतर या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. त्यामुळेच त्याला सध्याच्या कामात मदत होण्यासाठी प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेरा देण्याचे ठरले. त्यानुसार विजयसाठीची सप्रेम भेट, त्याच्या हातात पोहचल्यानंतर विजयाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अभिमानाने उर भरून आला. त्याच्या स्वप्नांना बळ देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, विजयाच्या चेहऱ्यावरील त्या आनंदाची मोजमाप होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.