विशेष लेख
राज्यातील गरीब व गरजू घटकांकरिता सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करण्यासाठी ‘शिवभोजन योजना‘ २६ जानेवारी २०२० पासून सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत दहा कोटी शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आले आहे.या योजनेचा आढावा घेणारा लेख ……
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘शिवभोजन योजना‘ महाविकास आघाडी शासनाची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे.राज्यातील कोणीही अन्नाविना उपाशी राहू नये, गरीब आणि गरजू जनतेला माफक दरात अन्न उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू झालेली ‘शिवभोजन योजना‘ ही अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.गेल्या दोन वर्षात आलेल्या नैसर्गिक संकटात शिवभोजन योजनेमुळे गरजू नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना कालावधीत किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.
शिवभोजन योजनेंतर्गत १० रूपये प्रति थाळी याप्रमाणे भोजन उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण व एक मृद भात याचा समावेश आहे. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी ५० रूपये व ग्रामीण भागामध्ये ३५ रूपये एवढी असून प्रति ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या १० रूपये एवढ्या रकमेच्या व्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून शासनाकडून भोजनालय चालकास देण्यात येते.
‘शिवभोजन योजना‘ सुरू झाल्यापासून ०८ जून २०२२ पर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत १० कोटी ७१ हजार ९५९ थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये १५ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२१ या काळात वितरित केलेल्या २ कोटी ७० लाख ५१ हजार ४७२ मोफत थाळ्यांचा समावेश आहे.
शिवभोजन योजनेतंर्गत राज्यात प्रतिदिन २.०० लाख एवढ्या शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात येत आहे. कोरोना काळात एकूण ९१३ नवीन शिवभोजन केंद्रांना मंजूरी देण्यात आली असून ३८ कार्यरत शिवभोजन केंदांच्या थाळीसंख्येत वाढ करण्यात आली आहे. सध्या राज्यात १,५२८ शिवभोजन केंद्र कार्यान्वित आहेत.
शिवभोजन योजना कार्यान्वित करण्यासाठी “शिवभोजन अॅप्लिकेशन” तयार करण्यात आले आहे. या ॲपचा वापर करुनच शिवभोजन थाळी वितरित करणे बंधनकारक आहे. शिवभोजन थाळ्या वितरित करण्यापूर्वी लाभार्थींचे नाव व छायाचित्र घेण्यात येतो.तर फोन नंबर वैकल्पिक आहे.या अॅपवर शिवभोजन केंद्र चालकास रोजचा मेन्यू प्रसिद्ध करता येतो.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थ्यांचे जेवणाअभावी हाल-अपेष्टा होत असल्याने दि. २९ मार्चच्या आदेशान्वये दि. १४ एप्रिल २०२१ पर्यंत शिवभोजन थाळी लाभार्थींना ५ रूपये मध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. या कालावधीत एकूण ३ कोटी ६८ लाख १० हजार ७७९ शिवभोजन थाळ्या वितरित करण्यात आल्या आहेत.
कोरोना कालावधीत शासनाने कडक निर्बंध लागू केल्याने गरीब व गरजू जनतेचे जेवणाअभावी हाल होऊ नये म्हणून १५ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण २ कोटी ७० लाख ५१ हजार ४७२ एवढ्या शिवभोजन थाळ्या लाभार्थींना निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात विविध भागात जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. महापुरामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आपत्तीग्रस्त भागातील शिवभोजन केंद्रावर दुप्पट क्षमतेने शिवभोजन थाळीचे वितरण केले गेले. पूरग्रस्तांना पूर कालावधीत सव्वादोन लाख शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आले होते.दि. ०१ ऑक्टोबर २०२१ पासून शिवभोजन थाळीचा दर पूर्वीप्रमाणे १० रूपये प्रतिथाळी एवढा करण्यात आला आहे.
राज्यात शिवभोजन योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच कार्यरत शिवभोजन केंद्रांवर परिणामकारक नियंत्रण ठेवण्याकरीता राज्यातील सर्व शिवभोजन केंद्रांमध्ये सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व शिवभोजन केंद्रांच्या १०० मीटर परिघामध्ये जिओ फेन्सिंग सुविधाही दि. २२ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे शिवभोजन केंद्रचालकांना केंद्राच्या १०० मीटर परिघामध्येच शिवभोजन योजनेचे व्यवहार करता येतात.
शिवभोजन योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत या योजनेवर ३३४ कोटी रूपये एवढा खर्च झाला आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात या योजनेसाठी २२० कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे.