परभणी प्रतिनिधी, दि.०२: महाराष्ट्र राज्यातील पुणे, धुळे, लातुर, औरंगाबाद, अकोला, जळगांव आणि अहमदनगर या जिल्ह्यातील जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले.
परभणी जिल्ह्यात अद्यापपर्यंतया रोगाचा जनावर (रुग्ण) आढळून आलेला नाही. या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होवु नये याची काळजी पशु पालकांनी घेण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अवाहन केले आहे. या रोगात जनावरांना खुप ताप येतो, जनावर चारा पाणी कमी घेते, अथवा घेणे बंद करते, नाका-डोळ्यातुन चिकट स्त्राव येतो, जनावरांच्या अंगावर गाठी येतात आणि पायावर सुज येवुन जनावर लंगडते अशी सर्वसाधारण लक्षणे दिसुन येतात.
बाधीत जनावर इतर निरोगी जनावरांपासुन वेगळे करुन त्याची सुचना नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यास देवुन पुढील उपचार करुन घ्यावेत. तसेच या रोगाचा प्रसार डास, माश्या, गोचिड, चिलटे इत्यादी मार्फत होत असल्याने गोठ्याच्या व जनावरांच्या स्वच्छतेची काळजी घेण्यांत यावी.
गोठयात किटकनाशकाची फवारणी करुन घ्यावी. या रोगाची लक्षणे, उपचार प्रतिबंधक उपाय आणि पशुपालकांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात पशुसंवर्धन विभागामार्फत जनजागृती मोहिम राबविण्यांत येत असुन, पशुपालकांनी घाबरुन न जाता आपल्या जनावरांवर वेळीच उपचार करुन घ्यावेत. जिल्ह्यात या रोगाचा प्रसार होवु नये म्हणुन प्रशासनातर्फे संपुर्ण उपाय योजना करण्यात येत आहे.
प्राण्यांमधील संक्रमक आणि सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये लंपी स्किन डिसीज रोग प्रादुर्भावाची माहिती पशुपालक, इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्राम पंचायत यांनी तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकिय संस्थेस / प्रशासनास देणे बंधनकारक असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले आहे.