गणेशोत्सव,नवरात्र उत्सव,दिवाळी,ख्रिसमस व ३१ डिसेंबर या दिवसासाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून वेळेची सवलत जाहीर

 

 

हिंगोली प्रतिनिधी, दि. ०६ : ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ च्या नियम ५ (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व  ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६:०० वाजल्यापासून  ते रात्रीचे १२:०० वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यासाठी  संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाने प्राधिकृत केले आहे.

 

            तसेच सन २०२२ या वर्षासाठी राज्य शासनाने निश्चित केलेल्या १५ दिवसांपैकी आतापर्यंत ५ दिवसांची सूट राज्यभर उपयोगात आलेली असल्याने  सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी उत्सव कालावधी लक्षात घेता सन २०२२ साठी उरलेले १० दिवस घोषित करण्याबाबत सूचित केले आहे.

 

 

            त्यामुळे जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आगामी उत्सव कालावधी लक्षात घेता गणेशोत्सव दुसरा व पाचवा दिवस, गौरी विसर्जन, अनंत चतुर्दशी (दि. ९ सप्टेंबर,२०२२), नवरात्री उत्सव दोन दिवस (दि. २९ सप्टेंबर, २०२२ व ०५ ऑक्टोबर, २०२२),  दिवाळी  एक दिवस (दि. २४ ऑक्टोबर, २०२२), ख्रिसमस एक दिवस (२५ डिसेंबर, २०२२) व  ३१ डिसेंबर एक दिवस (३१ डिसेंबर, २०२२) अशा उरलेल्या एकूण १० दिवसासाठी फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६:०० वाजल्यापासून रात्री १२:०० वाजेपर्यंत वेळेची सवलत हिंगोली जिल्ह्यासाठी निश्चित करुन जाहीर केले आहेत.

 

            या आदेशाची अंमलबजावणी या जिल्ह्याच्या हद्दीपुरती मर्यादित राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *