परभणी प्रतिनिधी,दि.२२: जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात आले. दि. १७ जुलै, २०२२ रोजी चाइल्ड लाइन – १०९८या टोल फ्रि क्रमांकावर मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार दि. १८ सप्टेंबर, २०२२ रविवार रोजी पालम तालूक्यातील केरवाडी येथे दोन अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
ही माहिती मिळताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष परभणी व चाईल्ड लाईन परभणी टिम केरवाडी येथे दाखल झाले. केरवाडी येथील ग्रामसेवक, पोलिस पाटील, उपसंरपच, अंगणवाडीताई उपस्थित होते.
त्यानंतर अल्पवयीन बालिका, तिचे पालक व नातेवाईक यांना बाल विवाह प्रतिबंध कायदा २००६ या विषयी माहिती दिली व गुन्ह्याबाबत शिक्षा व दंड यांची माहिती देवून बाल विवाहाचे मुलींवर होणारे दुष्परिणाम या सर्वांबाबत त्यांचे समुपदेशन करण्यात आले. या घटनेचा सर्वासमक्ष पंचनामा करून नियोजित वधुच्या पालकांना नोटीस देण्यात आली.
हा बाल विवाह सर्व यंत्रणाच्या समन्वयाने रोखण्यात आला असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.