‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत महाश्रमदान मोहीम यशस्वी
हिंगोली प्रतिनिधी, दि. २३ :- केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवले जात आहे. त्याअनुषंगाने आज हिंगोली जिल्ह्यातील ५६३ सर्व ग्रामपंचायतीमध्ये गावांच्या दृष्यमान स्वच्छतेसाठी महाश्रमदान मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये गावातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, मंदिर, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा, महाविद्यालय, दवाखाने, विविध सहकारी संस्था, सरकारी कार्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता व साफसफाई करण्यात आली व गावातील सार्वजनिक ठिकाणचे सार्वजनिक पानवठे, पिण्याच्या पाण्याच्या बाजूला सर्व स्वच्छता व करण्यात आली. गावातील केरकचरा व प्लास्टिक कचरा याचे विलगीकरण करुन वेगळा करण्यात आला.
यावर्षी या मोहिमेची दृष्यमान स्वच्छता ही संकल्पना आहे. गावामध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहीम राबविण्यासाठी स्वच्छता ही सेवा या मोहिमेत गावामध्ये महा श्रमदान कार्यक्रम आयोजित करुन दृष्यमान स्वच्छता , गावातील कचरा कुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, कचरा स्त्रोताच्या ठिकाणी (सुका व ओला) कचरा वेगळे करण्यासाठी जनजागृती करणे, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करणे, प्लॅस्टिकसारखा अविघटनशील कचरा एकत्रित करुन नियोजन करावे,
पाणवठ्यांजवळील परिसर स्वच्छ ठेवून वृक्षारोपण करणे, एकल प्लॅस्टिक वापराच्या दृष्परिणामांबद्दल जनजागरण करणे, हागणदारीमुक्त अधिक घटकावर सरपंच संवाद आयोजित करणे, गावात कचरा न करण्यासाठी जनजागृतीपर घोषवाक्य लेखन, प्रतिज्ञा घेणे, प्लॅस्टीक बंदी व स्वच्छता या विषयावर वक्तृत्व, निबंध, रांगोळी स्पर्धेचे शाळा, महाविद्यालय स्तरावर आयोजन करुन घेण्यात आले आहेत.
स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतींनी, गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी , कर्मचारी, मुख्याध्यापक, शाळेचे शिक्षक, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात युवक वर्ग व महिला बचत गटातील महिला यांचा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शाळेतील महाविद्यालयातील शाळेचे विद्यार्थी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले आहे.
या मोहिमेसाठी जिल्ह्यातील विविध विभागाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभाग प्रमुख यांनी महाश्रमदान कार्यक्रमास उपस्थित राहून स्वच्छता व श्रमदान मोहीम व्यापक प्रमाणात राबवून महाश्रमदान कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.
तसेच २ ऑक्टोंबर २०२२ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात व्यापक प्रमाणात महाश्रमदान मोहिम राबविण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व गावात महाश्रमदान मोहिम राबविण्यात येणार आहे.
विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात उस्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी हिंगोली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांनी केले आहे.