बीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध, निधीची कमतरता पडू देणार नाही

बीड, दि. ०७ : बीड जिल्ह्याच्या विकासाची सर्व कामे गतीने होण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करू. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही सहकारमंत्री तथा बीडचे नवनियुक्त पालकमंत्री अतुल सावे यांनी आज येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, अतिरीक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत आदिंसह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध खातेप्रमुखांनी जनहिताच्या कामांसाठीच्या आवश्यक निधीसंदर्भात यादी सादर करावी, असे स्पष्ट करून पालकमंत्री अतुल सावे यांनी सप्टेंबर महिन्यामधील पावसाच्या पार्श्वभूमिवर अतिवृष्टी पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश दिले. तसेच, पीकविमा अग्रीमासंदर्भात विम्या कंपन्यांशी वित्त विभागाची बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य विभागाच्या योजना राबविण्यासाठी आवश्यक शासकीय निधीसह गरजेनुरूप रूग्णवाहिकांसाठी सीएसआरमधूनही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, महावितरण विभागाने बंद ट्रान्सफॉर्मर त्वरित बदली करण्याबाबत प्राधान्याने उचित कार्यवाही करावी. जनतेच्या अडचणी, तक्रारी दूर कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री अतुल सावे यांनी या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत मंजूर नियतव्यय, प्रस्तावित कामे, प्रशासकीय मान्यता, प्राप्त निधी, झालेला खर्च तसेच कामांची प्रगती, सन २०२१-२२ मधील कामांचे दायित्त्व व सन २०२२ – २३ मधील मंजूर नियतव्ययच्या अनुषंगाने प्रस्ताव, जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना/ओटीएसपी) चे प्रस्ताव याबाबत खातेनिहाय आढावा घेतला. तसेच आवश्यक मौलिक सूचना प्रशासनाला दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत कामांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती सादर केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण कामांची माहिती दिली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण, बांधकाम, आरोग्य, कृषि, महिला व बालकल्याणसह अन्य विभागांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महावितरण, आरोग्य, नगरविकास, वन, क्रीडा, सहकार, गृह, व्यावसायिक शिक्षण, आदिवासी विकास आदिंसह अन्य विभागांची माहिती संबंधित खातेप्रमुखांनी सादर केली.

दरम्यान, पालकमंत्री अतुल सावे यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *