कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे पीक विमा कंपनीचे पितळ उघड

 

 

 

चंद्रपूर, दि. २८ :-  स्थानिक नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करतांना विमा कंपनीने अफरातफर केल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. सदर बाब उघडकीस येताच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आढावा बैठक घेऊन याबाबत त्वरीत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे तर तालुकास्तरावरून तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

 

 

 

 

कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी आणि विमा कंपनीचा प्रतिनिधी हे संबंधित शेतक-यासमोर पिकांचे पंचनामे करीत असतात. मात्र विमा कंपनीने शेतक-यांसमोर केलेल्या पंचनाम्यात अफरातफर केल्याचे समोर आले आहे. यात मूळ पंचनाम्यात खोडतोड, बनावट स्वाक्षरी, आकड्यांमध्ये तफावत, वेगळे शिक्के, बनावट झेरॉक्स असे प्रकार काही तालुक्यांमध्ये आढळून आले आहेत.

 

 

 

 

 

सदर बाब जिल्हाधिका-यांच्या लक्षात आणून देताच कृषी विभागाचे अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत जिल्हाधिका-यांनी बैठक घेतली. पंचनाम्यामधील आकड्यात तफावत, खोडतोड, व्हाईटनर लावून पुन्हा लिहिलेले असे वेगवेगळे वर्गीकरण करून तालुका कृषी अधिका-यांनी त्वरीत जिल्हा मुख्यालयी माहिती सादर करावी. जेणेकरून विमा कंपनीकडून मूळ पंचनाम्याची प्रत उपलब्ध करणे सोपे होईल. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

 

 

 

 

 

जिल्ह्यात आतापर्यंत सहा तालुक्यातील ११११ पंचनाम्यामध्ये तफावत आढळून आली असून यात सर्वाधिक वरोरा तालुक्यात ८२२ प्रकरणे, चिमूर १६२, पोंभुर्णा ६०, गोंडपिपरी ३७, चंद्रपूर २५ आणि सावली येथील ५ प्रकरणांचा समावेश आहे. काही तालुक्यांचा अहवाल अप्राप्त असून त्यांनी त्वरीत अहवाल सादर करावा. तर इतर तालुक्यातील अहवाल निरंक असला तरी तेथील तालुका कृषी अधिका-यांनी याबाबत माहिती घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिका-यांनी दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *