महाज्योतीतर्फे एमपीएससी आणि युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

 

हिंगोली, दि. २९ :- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आहे. संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग,विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी यासाठी विविध योजना राबवत असते. वर्ष २०२३-२४ साठी महाज्योतीतर्फे एमपीएससी आणि युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे.

एमपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण

एमपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी  मोफत ऑफलाईन व अनिवासी पध्दतीने, महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. प्रशिक्षणाचा नियोजित कालावधी ११ महिने आहे.

 

 

 

 

प्रशिक्षणासाठी निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणासाठी रुजू होतील त्या दिनांकापासुन महाज्योतीच्या धोरणानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणास ७५ टक्के उपस्थिती असणाऱ्यांनाच प्रतिमाह १० हजार विद्यावेतन लागू होईल. एकवेळ आकस्मिक खर्च रुपये १२ हजार देण्यात येईल.

 

 

युपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण

युपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण ११  महिन्यांचे पूर्व, मुख्य तसेच व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षणासोबत अभ्यास साहित्य घरपोच देण्यात येईल. पुणे येथे प्रशिक्षणासाठी निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना रुपये १० हजार प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ १२ हजार रुपये आकस्मिक खर्च देण्यात येईल. दिल्ली येथे ऑफलाईन प्रशिक्षणासाठी निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना १३ हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ १८ हजार रुपये आकस्मिक खर्च देण्यात येईल.

 

 

 

प्रशिक्षणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, मार्कशीट अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक जोडावे. पासबूक किंवा रद्द केलेला धनादेश जोडावा.

 

 

 

 

 

प्राप्त अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल. विद्यार्थ्यांची राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

 

 

 

 

 

विद्यार्थांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application Training २०२३-२४ यावर जाऊन सर्व अटी व शर्तीचे पालन करुन दिनांक १० एप्रिल, २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

 

 

 

महाज्योतीच्या एमपीएससी/युपीएससी पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेल्या विद्याथ्याचे मनोगत

शीतल घोलप- युपीएससी परीक्षा पुर्व प्रशिक्षणार्थी

संगणक अभियांत्रिकीमधे पदवी प्राप्त केल्यानंतर मी युपीएससीच्या तयारीला लागले. त्यावेळी लहान भावंडाचेही शिक्षण सुरु होते. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे दिल्ली येथे जाऊन महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नव्हते. सोशल मध्यमातून महाज्योतीचा युपीएससी पूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती. सर्व अटी शर्तीसह ऑनलाईन नोंदणी अर्ज दाखल केला. चाचणी परिक्षा दिली.

 

 

 

 

आणि माझी निवड झाली. मला महज्योती मार्फत दिल्लीचा नामांकित श्रीराम आयएएस संस्थेमध्ये पूर्वपरीक्षेच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळाला. त्यादिवसापासून माझ्या विद्यावेतनास सुरवात झाली. मी परभणीतून दिल्लीला गेले. दिल्लीसारख्या महागड्या शहरात माझ्यासारख्या अनेक सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची आणि राहण्याची सोय झाली. श्रीराम आयएएस संस्थेचे पूर्व, मुख्य आणि वैकल्पिक विषयांची सर्व पुस्तके मिळाली.

 

 

 

 

प्रदिप शिंदे – एमपीएससी परीक्षा पुर्व प्रशिक्षणार्थी

मी प्रदिप नंदकुमार शिंदे. बीफॉर्मचा विद्यार्थी आहे. सध्या एमपीएससीची तयारी करीत आहे. पण प्रॉपर मार्गदर्शन न मिळाल्याने अभ्यास केल्याचे सामाधान मिळत नव्हते. त्यावेळी फेसबुकवर महाज्योतीच्या एमपीएससी परीक्षा प्रशिक्षण योजनेबद्दल वाचले. आणि त्यात नाव नोंदविले.

 

 

 

 

सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. काही दिवसात ऑनलाईन माध्यमातून एमपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण सुरु झाले. सुरुवातीलाच कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा सांगितले. आपल्या ध्येयाप्रती सजग केले. मी बी फॉर्मचा विद्यार्थी असल्यामुळे मला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास हे विषय समजण्यास कठीण जायचे.

 

 

 

 

पण महाज्योतीच्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकविल्या जात असलेल्या शिक्षकांकडून ते मला समजायला सोपे जाऊ लागले. या विषयातील माझा आत्मविश्वास वाढला. महाज्योतीकडून एमपीएससी पुर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी अद्ययावत, दर्जेदार शैक्षणिक साहित्य संचही देण्यात आला. त्यातून अभ्यास करतांना अधिकाधिक पुढे जात आहे. एखादे लक्ष्य गाठायचे असेल तर आपल्या साध्याबरोबर साधनेही सोबत असली पाहिजेत तरच लक्ष्य गाठता येईल. महाज्योती याची पुरेपुर काळजी घेते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *