नांदेड प्रतिनिधी,दि.२८ :- श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा संयोजन समिती वसमत च्या वतीने धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या जगवेगळ्या अखंडीत सेवा कार्याबद्दल शुक्रवार दि.३१ मार्च रोजी ‘देवदूत’ पदवी प्रदान करण्यात येणार असून ठाकूर यांच्या पुरस्काराची संख्या ८१ झाल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
श्री बालाजी मंदिर डॉ. तांभाळे हॉस्पिटलच्या मागे,वसमत जि.हिंगोली येथे होत असलेल्या शिवमहापुराण कथेमध्ये देवदूत’ ही पदवी देण्याचा निर्णय संयोजन समिती सदस्य श्रेयस कदम, सुधाकर रोकडे,एल. एम.सातपुते,नितीन कदम, श्रीरंगराव मुंजाळ यांनी घेतला.तेरा वर्षात ७ लाखापेक्षा जास्त जेवणाचे डबे गरजूंना वाटप करणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी समाजसेवेमध्ये एक अनोखा पायंडा पाडलेला आहे.
वर्षभरातून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ७८ उपक्रम ते नांदेडमध्ये घेतात. रस्त्यावर फिरणाऱ्या वेड्या लोकांना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एकत्र करून त्यांची दाढी कटिंग करण्यात येते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून नवीन कपडे व शंभर रुपये बक्षीस देण्याचा आगळावेगळा कायापालट हा उपक्रम गेल्या २६ महिन्यापासून सुरू आहे.
दरवर्षी हिवाळ्यात ४० मध्यरात्री फिरून रस्त्यात कुडकुडत झोपलेल्या बेघर नागरिकांना २००० पेक्षा जास्त ब्लॅंकेट चे वाटप गेल्या चार वर्षापासून त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. पावसाळ्यात कृपा छत्र या उपक्रमां अंतर्गत आतापर्यंत चार वर्षात आठ हजारापेक्षा जास्त छत्र्याचे वाटप करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अनवाणी फिरणाऱ्या व्यक्तींसाठी चरण सेवा या उपक्रमा अंतर्गत चप्पला वाटप करण्यात येते. देशातील सर्वात मोठे कवी संमेलन नरेंद्र देवेंद्र महोत्सव गेल्या वीस वर्षापासून दिलीपभाऊ घेत असतात.
या कार्यक्रमाला लाखो रसिक रात्रभर उपस्थित राहतात. रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटले जाते स्वतः४२ वेळा रक्तदान करून ५६०० पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या दिलीप ठाकूर यांनी जमा केले आहेत. भाऊचा माणुसकीचा फ्रिज हा उपक्रम नांदेड शहरात सध्या गाजतोय. अन्न वाया जाऊ नये तसेच नांदेड शहरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी हा फ्रिज ठेवण्यात आला आहे.
दररोज किमान ४० डबे या फ्रिजमध्ये ठेवण्यात येतात.नांदेड मध्ये कोरोना लस देण्यास सुरू झाली त्या दिवसा पासून आज पर्यंत ७४० दिवस पूर्ण झाले आहेत. दररोज दवाखान्यात ते मास्क,सॅनिटायझर बिस्किट व पाण्याची बॉटल वितरित करतात. जोपर्यंत लस देणे सुरू राहील तोपर्यंत हा उपक्रम चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. यासारखे अनेक उपक्रम दिलीपभाऊ राबवीत असतात. त्यामुळे त्यांना देवदूत अशी पदवी देण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती श्रेयस कदम यांनी दिली आहे.