नवी दिल्ली,दि. २८ :- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) काल दिनांक २७ मार्च २०२२ रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथून, एकात्मिक चाचणी केंद्र द्वारे, मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या (MRSAM) भारतीय लष्कराच्या आवृत्तीच्या दोन यशस्वी चाचण्या घेतल्या. अतिशय वेगवान लक्ष्यांवर थेट गोळीबार करण्यासंबंधी या चाचण्या करण्यात आल्या. क्षेपणास्त्रांनी प्रथम हवाई लक्ष्यांना भेदले आणि दोन्ही बाजूनी थेट मारा करून त्यांचा पूर्णपणे नाश केला. पहिली चाचणी मध्यम उंचीच्या लांब पल्ल्याच्या लक्ष्याला रोखण्यासाठी होती आणि दुसरी चाचणी कमी उंचीच्या लहान श्रेणीच्या लक्ष्याची क्षमता सिद्ध करण्यासाठी होती.
हे मध्यमपल्ल्याचे क्षेपणास्त्र (MRSAM) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनेआणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI), इस्रायल यांनी भारतीय लष्कराच्या वापरासाठी संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. एमआरएसएएम (MRSAM) आर्मी वेपन यंत्रणेमध्ये मल्टी-फंक्शन रडार, मोबाईल लाँचर सिस्टम आणि इतर वाहनांचा समावेश आहे.या चाचण्या शस्त्रास्त्र प्रणालीसह वितरित करण्यायोग्य कॉन्फिगरेशनमध्ये केल्या गेल्या. आयटीआर, चांदीपूरने तैनात केलेल्या रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि टेलीमेट्री यांसारख्या श्रेणी साधनांद्वारे कॅप्चर केलेल्या फ्लाइट डेटाद्वारे या शस्त्र प्रणालीच्या कार्यप्रदर्शनाची पडताळणी करण्यात आली. डीआरडीओ आणि भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या चाचण्या घेण्यात आल्या.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एमआरएसएएमच्या यशस्वी चाचण्यांबद्दल डीआरडीओ, भारतीय लष्कर आणि सहभागी उद्योग कंपन्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, दोन्ही यशस्वी चाचण्यांनी महत्वपूर्ण अंतरावरील लक्ष्यांना रोखण्यासाठी शस्त्र प्रणालीची क्षमता स्थापित केली आहे.
संरक्षण विभागाचे संशोधन आणि विकास सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी एम आरएसएएमच्या (MRSAM) लष्करी आवृत्तीच्या यशस्वी उड्डाण चाचणीमध्ये सहभाग घेतलेल्या पथकाचे कौतुक केले आणि या चाचण्या ‘आत्मनिर्भर भारत’ साठी मैलाचा दगड असल्याचे नमूद केले.