लातूर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

जिल्ह्यात घरोघरी तिरंगा फडकविला जावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती

 

ग्रामपंचायत कार्यालय, बचत गट यांच्याकडून विक्री केंद्र सुरु

लातूर, दि.०७: लातूर जिल्हा परिषदेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केले असून ८ ते १७ ऑगस्ट, २०२२ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वराज्य महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ ही मोहिम दिनांक १३ ते १५ ऑगस‌्ट, २०२२ पर्यंत राबविली जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, बचत गट यांच्याकडून तिरंगा झेंडा विक्री केंद्रही गावोगावी सुरू केली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी सांगितली आहे.

विशेष ग्रामसभा

दिनांक ८ ऑगस्ट, २०२२ रोजी ग्रामससेवक व वार्ड अधिकारी यांनी ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रासभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामसभेत आजादी का अमृत महोत्सव या विषयावर चर्चा करावी. हर घर झेंडा हा उपक्रम प्रत्येक नागरिकांनी राबवावा याविषयी ग्रामसभा घेऊन माहिती सांगावी असे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत. स्वराज्य महोत्सव उपक्रमांतर्गत रोज संध्याकाळी स्मार्ट टी. व्ही., प्रोजेक्टरद्वारे क्रांती ( १९८१) हा देशभक्तीपर चित्रपट दाखविण्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे.

हर घर तिरंगा,सडा रांगोळी, प्रभातफेरी

दिनांक ९ ऑगस्ट, २०२२ रोजी सर्व ग्रामस्थ, गृहिणी यांनी प्रत्येक नागरिकांनी पारासमोर सडा रांगोळी करावी. घराला तोरण बांधावे आणि गावातील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावे. तसेच ग्रामसेवक, सरपंच, वाॅर्ड अधिकारी, शिक्षक विद्यार्थी व अंगणवाडी सेवक, अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गावातील ज्येष्ठ मंडळींनी व स्वातंत्र्य सैनिकांकडून गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे नियोजन आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात, रस्त्याच्याकडेला स्वातंत्र्य लढ्यातील योगदान दिलेल्या नेत्यांचे फोटो लावावेत. शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजन करावे. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही/प्रोजेक्टद्वारे देशभक्तीपर चित्रपट-‘कर्मा ‘ दाखविण्यात यावा.

स्वच्छता मोहीम

दिनांक १० ऑगस्ट, २०२२ रोजी ग्रामसेवक, सरपंच यांनी गावातील महत्वाची सार्वजनिक ठिकाणे, वास्तू व वारसास्थळे या ठिकाणची स्वच्छता करुन सुशोभिकरण करावे. शाळेत निबंध व रांगोळी स्पर्धा घेण्यात याव्यात.

तसेच यासोबतच महिला मेळावे अंगणवाडी सेविका व आशा वर्कर, शाळेतील शिक्षिका यांनी पुढाकार घेवून महिला मेळाव्याचे आयोजन करावे. स्वातंत्र्यविषयी मार्गदर्शन करावे. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही / प्रोजेक्टरद्वारे देशभक्तीपर ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक ‘ दाखविण्यात यावा.

महिला बचत गट मार्गदर्शन, गावाचा/राष्ट्राचा इतिहास

दिनांक ११ ऑगस्ट, २०२२ रोजी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर ग्रामस्तरावर महिला बचत गटाचे मेळावे घ्यावेत. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ कशी उपलब्ध होईल त्यांना बँकाकडून अर्थसहाय्य कसे होईल याबाबत मार्गदर्शन करावे. शाळेत चित्रकला स्पर्धा घेण्यात याव्यात.

तसेच गावाच्या इतिहासाची माहिती तरुरण पिढीला होणे आवश्यक आहे. यासाठी माहिती नोंद करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांकडून करण्यात यावी. विद्यार्थ्यांचे गट तयार करुन त्यांना प्रश्नावली देण्यात यावी. सदर प्रश्नावली घेवून विद्यार्थी गावातील ज्येष्ठांना भेटतील व गावाची संपूर्ण माहिती प्राप्त करुन घेतील. शाळेत रांगोळी स्पर्धा घेण्यात याव्यात. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही / प्रोजेक्टद्वारे देशभक्तीपर चित्रपट-उपकार (मनोजकुमार) यांचा दाखविण्यात येणार आहे.

मोबाईल दुष्परिणाम मार्गदश्रन व चर्चा

दिनांक १२ ऑगस्ट, २०२२ रोजी आरोग्य अधिकारी व संगणक तज्ञ मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यासाठी ग्रामस्थांशी संवाद साधावा. मोबाईलमुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम, मुलांच्या अभ्यासावर होणारा परिणाम आणि अनावश्यक बाबींमुळे वाया जाणारा वेळ याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात यावे. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही / प्रोजेक्टरद्वारे देशभक्तीपर चित्रपट-‘लगान’ दाखविण्यात यावा.

गोपाळांची पंगत, सेंद्रीय शेती मार्गदर्शन, शेतकरी मेळावे, पर्यावरण संवर्धन शपथ

दिनांक १३ऑगस्ट, २०२२ रोजी अंगणवाडीत अनौपचारिक शिक्षण घेणाऱ्या बालकांसाठी गोपाळांची पंगत हा उपक्रम घेण्यात यावा. गावातील दानशूर व्यक्तींनी, उद्योजकांनी यासाठी पुढाकार घ्यावा.

सर्व ग्रामस्थांनी जमिनीचे आरोग्य सुधारणे, जमीन विषमुक्त करणे व सेंद्रिय अन्नधान्य टिकवणे यासाठी कार्यशाळा आयोजित करावा. या कार्यशाळेत किटकनाशके, सेंद्रिय शेती मार्गदर्शन तणनाशके, सेंद्रिय खाते, रासायनिक खी यांचा जमिनीवर व मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत जाणीवजागृती करावी.

शेतकरी मेळावे घेवून विशेष कार्यक्रम आयोजित करावा. रासायनिक खते, किटकनाशके यांचा अतिवापरामुळे होणारे जमिनीचे हवामान अंदाज याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

आम्ही गावकरी शपथ घेतो की, आम्ही निसर्गाचे रक्षण करु, प्लास्टिक वस्तू वापरणार नाही, वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करु तसेचे वृक्षतोड, वणवा यापासून निसर्गाला वाचवू अशी पर्यावरण संवर्धन शपथ सर्वांनी घ्यावी. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही/प्रोजेक्टरद्वारे देशभक्ती-पर चित्रपट –’तिरंगा’ दाखविण्यात यावा.

वृक्षारोपण

दिनांक १४ ऑगस्ट, २०२२ रोजी ग्रामसेवक, सर्व ग्रामस्थ विद्यार्थी व शिक्षक यांनी सर्व ग्रामपंचायतीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम हाती घ्यावा. किमान ७५० रोपे लागवड करावी. सामाजिक वनीकरण विभागाने वनस्पातींची रोपे पुरवावी. वृक्षांची लागवड व वृक्षसंवर्धन करावे. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही / प्रोजेक्टरद्वारे देशभक्तीपर चित्रपट-‘बॉर्डर ‘ दाखविण्यात यावा.

प्रभातफेरी शालेय स्पर्धा

दिनांक १५ ऑगस्ट, २०२२ रोजी शाळा कॉलेज, सर्व कार्यालये व ग्रामस्थ प्रभातफेरी काढावी. विद्यार्थ्यांच्या हातात गावातील क्रांतिकारकांची नावे असणारे फलक, अनसंग हिरो यांची नावे/फोटो असणारे फलक देण्यात यावेत. गावात विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षिस वितरण करणे. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही / प्रोजेक्टरद्वारे देशभक्तीपर चित्रपट – ‘द लिजंड ऑफ भगतसिंग’ दाखविण्यात यावा.

किशोरी मेळावे

दिनांक १६ ऑगस्ट, २०२२ रोजी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांच्या सहभागातून किशोरी मेळाव्याचे समुपदेशन करावे. योग्य व सकस आहार, बालविवाहाचे दुष्परिणाम यावरही चर्चा करावी. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही / प्रोजेक्टरद्वारे

देशभक्तीपर चित्रपट – ‘शहीद’ दाखविण्यात यावा.

सांगता समारोह, स्वराज्य फेरी

दिनांक १७ऑगस्ट, २०२२ रोजी स्वराज्य महोत्सव सांगता समारोह करतांना प्रभात फेरीचे आयोजन करावे. देशभक्तिपर स्फुर्तीदायक गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत, महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही / प्रोजेक्टरद्वारे देशभक्तीपर चित्रपट – ‘लक्ष्य’ दाखविण्यात यावा.

८ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट पर्यंत स्वराज्य महोत्सवांतर्गत हे वरील कार्यक्रम घेण्यात येणार असून यातून नव्या पिढीला स्वातंत्र्याचे मोल, स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, त्याग कळेल अशी या मागची भावना असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *