गेल्या सात आठ दिवसात पावसानं चांगलीच हजेरी देगलूर तालुक्यात लावली. कधी संतधार तर कधी प्रचंड वेगाने पाऊस या तालुक्यात बरसला. नद्या नाले तुडुंब भरली आणि मग हळूहळू या नद्यांना पूर येऊ लागला, वनाळी ,तूपशेळगाव, मनशक्करगा, आलुर या गावांना पुराचा तडाका बसला.
तालुक्यातील प्रगतशील शेतकरी अनिल तोताडे यांनी फेसबुक वर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये या पुराच्या पाण्याने शेतातील संपूर्ण पिक निस्तनाबूत झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
प्रसिद्ध व्यावसायिक व शेतकरी डॉ.मिलिंद शिकारे यांनीही फेसबुक द्वारे शेतात पिकांचे झालेले नुकसान समाजापुढे निदर्शनास आणून दिले. माननीय सुधाकर पाटील भोकसखेडकर यांनी भोकसखेडा आणि त्या परिसरातील लेंडी नदीला
आलेल्या पुरा संबंधी फेसबुक द्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी नेते मा. कैलास येजगे यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन फेसबुक च्या माध्यमातून केले. सर्वच प्रसार
माध्यमातून या पुरा विषयी बातम्या येत होत्या. हे सारं बघून मन अस्वस्थ होत होतं .
बी बियाणे खत, ट्रॅक्टरचा खर्च वाढलेली शेतमजुरांची मजुरी या सर्वांचा विचार करता शेतकरी नेहमीच तोट्यातच राहतो आणि त्यात मग असे नैसर्गिक संकट आले की मग पूर्ण कर्जात बुडून जातो. सरकार मग ते कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्या
विचाराच असो नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात च असतं. वर्षांनवर्षै शेतीविरोधी कायदे या स्वातंत्र्य भारतात लागू आहेत त्यामुळे आधीच शेतकरी खचला आहे.
अत्यंत खेदाने मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की शेतकरी कधीच एकसंघ
एकजूट झाला नाही. शेतकरी शेतात जातो तेव्हा तो शेतकरी असतो पण गावात आला की मग कोणत्यातरी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता. राजकीय विचारधारा कोणती असू द्या ज्यांना मदत करायचे त्यांना करा पण कधी तरी शेतकरी म्हणून सर्व शेतकरी एकत्र आले पाहिजे असे मला वाटते.
समाजात विविध घटकांच्या संघटना आहेत आणि त्यांनी आपल्या एकीच्या बळावर आपलं हित साधलेल आहे. शेतकरी एकजूटीचा कधी असा अनुभव आला नाही त्यामुळे की काय शेतकऱ्यांना कधी न्याय मिळाला नाही.
कमीत कमी अशा संकटाच्या काळात तरी सर्वांनी एकत्र येऊन प्रस्थापित सरकारला नुकसान भरपाई देण्यास मजबूर करावे असे वाटते.
आजच्या या परिस्थितीत शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. खरंच या पावसानं शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फोडला आहे.
राजू पाटील लच्छनकर
६३०४८७ ३७२४