• हिंगोली विधानसभा मतदारसंघात स्वीप कार्यक्रमाने सुरुवात
हिंगोली, दि.१० : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ९४-हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वीपच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित मतदार जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ९४-हिंगोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी प्रशांत दिग्रसकर, डायट प्राचार्य दिपक साबळे, ज्येष्ठ अधिव्याख्याता अमोल निळेकर, स्वीप नोडल अधिकारी नितीन नेटके उपस्थित होते. मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्राकडे वळवून मतानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभाग प्रयत्न करत आहे. याकामी मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे.
सर्वांनी आपापल्या प्रयत्नातून प्रत्येक व्यक्ती मतदान करेल, यासाठी प्रयत्नशील राहून मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन श्री. गोयल यांनी केले. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ९४ -हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वीपच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. स्वीप अंतर्गत दिनांक ८ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घ्यावयाच्या उपक्रमामध्ये मतदार शपथ, निवडणूक गीत, रांगोळी, पथनाट्य, मतदान जनागृतीविषयक चित्रकला,
पोस्टर स्पर्धा, मानवी साखळी, संकल्प पत्र, मॅरेथॉन, पायी रॅली, सायकल मोटार तथा मोटर सायकल रॅली व घरोघरी प्रत्यक्ष भेट या उपक्रमाचा समावेश केला गेला आहे. शाहीर प्रकाश दांडेकर व इतर कलावंत यांच्याद्वारे कार्यक्रमाची सुरुवात मतदान जागृती गीताने झाली. जिल्हा स्वीप नोडल अधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी आपल्या प्रास्ताविकेमधून स्वीप अंतर्गत झालेल्या उपक्रमाचा व येत्या काही दिवसात होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा स्पष्ट केला. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वाक्षरी मोहिमे अंतर्गत मी मतदान करणारच.! अशा आशयाच्या बोर्डवर स्वाक्षऱ्या करून १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार केला.
विधानसभा निवडणुकीत निःपक्षपणाने, कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब न करता, शांततापूर्ण वातावरणात, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्यासंदर्भात उपस्थित सर्वांनी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीप सदस्य राजकुमार मोरगे यांनी केले तर आभार स्वीप नोडल अधिकारी नितीन नेटके यांनी मानले. कार्यक्रमासाठी तालुका आयकॉन एम. एम. राऊत, स्वीप सदस्य विनोद चव्हाण, संजय मेथेकर, शाम स्वामी, विजय बांगर, बालाजी काळे, दिपक कोकरे, राजकुमार मोरगे तसेच मोठ्या प्रमाणावर मतदार उपस्थित होते.